अहिल्यानगर- तब्बल सतरा वर्षांनंतर मालेगाव स्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह सर्व आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानं साधूसंतांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. उत्तराखंडातील जोगेश्वरधामचे महंत महादेव दास यांनी यावर आनंद व्यक्त केलाय. आपल्याच देशात न्याय मिळवण्यासाठी 17 वर्षं लागली असल्याची खंतही त्यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केलीय. "साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या षडयंत्राच्या पीडित आहेत. सनातन हिंदू धर्म कधीही दहशतवादासोबत नाही. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या महान संतांच्या ठिणगीला घाबरून त्यांना मालेगाव स्फोटात फसवलं आहे", असे महंत महादेव दास यांनी म्हटलंय. निकाल येण्यासाठी खूप उशीर लागला असला तरी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत आहे. हा विजय एकट्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा नसून त्या सर्व पीडित साधूसंतांचा असल्याचंही महंत महादेव दास यांनी म्हटलं.