पुणे : शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले असून, औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर असलेल्या खड्ड्यामुळे 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ काशिनाथ काळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. या दुर्घटनेनंतर "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डा असून, या खड्ड्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचं नागरिक सांगत आहेत. याच ठिकाणी 30 जुलै रोजी एक दुर्दैवी घटना घडली. 61 वर्षीय जगन्नाथ काळे हे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्या रस्त्यानं जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. रस्ता आणि पेव्हिंग ब्लॉकच्या मध्ये झालेल्या मोठ्या खड्ड्यातून गाडी स्लीप झाली आणि त्यांचा तोल गेला. त्याच क्षणी मागून आलेल्या एका कारखाली ते चिरडले गेले. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, प्रशासनाच्या हलगर्जीमुळे झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.