पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलातील औंध ते शिवाजीनगर या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सिद्धार्थ शिरोळे हे उपस्थित राहणार आहेत. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या अगोदरच भारतीय जनता पार्टी पक्ष तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सामोरासमोर आले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जो दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्या उड्डाणपुलाची एकूण लांबी ही १७६३.५२ मीटर असून विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी यासाठी हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.