पुणे (Ganesh Chaturthi 2025) : राज्यात भक्तिभावाच्या वातावरणात आज आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. विघ्नहर्ता आणि सुखकर्ता गणरायाच्या आगमनामुळं राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी मोठ्या भक्तिभावाने बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 'गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया'चा जयघोषात आज मोठ्या उत्साहात पुण्यात देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. पुण्यात मानाच्या पाचही गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला मोठ्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती (Tambdi Jogeshwari Ganpati) मंडळाच्या वतीनं श्रींच्या आगमन मिरवणुकीत विष्णूनाथ शंख पथक यांच्याकडून उत्कृष्ट असा शंखनाद करण्यात आला. या आगमन मिरवणुकीत ठिकठिकाणी वाजवण्यात आलेल्या शंखनादाने पुणेकरणचं लक्ष वेधून घेतलं.