अहिल्यानगर : राहाता शहरात गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेश मित्र मंडळानं भुतांचं विश्व दाखविणाऱ्या काल्पनिक 'पुरानी हवेली'चा देखावा साकारला आहे. या देखाव्याला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळता आहे. गणेशोत्सवात साकारलेला हा थरारक देखावा दररोज रात्री 8 ते 11 पर्यंत सर्वांना पाहण्याकरिता उपलब्ध आहे. लहान मुलं, महिला आणि सर्व नागरिकांसाठी हा देखावा एक थरारक अनुभव ठरत आहे. बाल कलाकार चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आणि विशेष वेशभूषा धारण करून चित्रपटातील भुतांच्या दृश्यांप्रमाणं थरारक अनुभव देत नागरिकांचं मनोरंजन करतात. भुतांचे आवाज, प्रकाशयोजना आणि विविध भयावह अभिनयामुळं हा देखावा अधिकच जिवंत वाटतो. हा जिवंत देखावा बघताना अनेकांचा काळजाचा ठोका देखील चुकतो. जगात भूत नाही, त्यामुळं ती भीती घालवण्यासाठी तसंच अंधश्रद्धा नष्ट व्हावी, हा या देखाव्यामागील हेतू असल्याचं मंडळाचं अध्यक्ष विजय मोगले यांनी सांगितलं.