'गणपती बाप्पा मोरया!' च्या जयघोषात आज (6 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन अभिषेक केला.
विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती सभामंडपातून मुख्य मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्नीक गणरायाचं दर्शन घेतलं आणि विधिपूर्वक अभिषेक केला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “आपण मोठ्या उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं, आणि ते दहा दिवस कसे गेले कळलंच नाही. आज विसर्जनाचा दिवस आहे आणि विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडावी अशी अपेक्षा आहे. मला आज इथे दर्शनासाठी बोलावण्यात आलं होतं, आणि मी बाप्पाच्या चरणी अभिषेक करत संपूर्ण राज्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली.”
“आपला शिव, शाहू आणि फुले यांचा महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा, तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठीही आज बाप्पाकडे प्रार्थना केली,” असंही ते म्हणाले.