पुणे : आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यावर मोठ्या उत्साहात नागरिकांनी बाप्पाची सेवा केली. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. शनिवारी अनंत चतुर्दशीला सकाळी साडे नऊ वाजता महात्मा फुले मंडई इथल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. 'गणपती बाप्पा मोरया...' 'मंगलमूर्ती मोरया...'च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात आहे. विसर्जन मिरवणुकीत मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत स्वरूपवर्धिनी पथकातील लहान मुलांनी सादर केलेल्या मल्लखांब प्रात्याक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली. मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या 125 व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता वैभवशाली मिरवणुकीनं झाली. तुळशीबाग गणपतीची मिरवणूक मयूर रथातून निघाली आहे. मयूर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून हा रथामध्ये हायड्रोलिक पद्धतीचा वापर केला आहे.