मुंबई : गणपती बाप्पांच्या (Ganpati) विसर्जनासाठी मुंबईकरांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सकाळपासूनच गणपतीच्या मोठ-मोठ्या मिरवणुका शहरातून समुद्र किनाऱ्यावर येत आहेत. मुंबईत आज भाविकांची रेलचेल असून जुहू चौपाटीवर (Juhu Chaupati) हजारोंच्या संख्येनं भाविक जमले आहेत. मुंबई महापालिकेनं तब्बल दोन महिने या विसर्जन सोहळ्याची तयारी केलीय. शनिवारी विसर्जनाच्या दिवशी मुंबई महापालिकेनं कृत्रिम तलावात विक्रमी विसर्जन होणारा यात शंका नाही असं म्हटलय. सहा फुटाखालील सर्वच मूर्तींचं केवळ कृत्रिम तलावात विसर्जन होत आहे. ज्याला जुहू बीचही अपवाद नाही. सार्वजनिक मंडळाच्या केवळ सहा फुटांवरील मूर्तींनाच समुद्रात पालिकेच्या देखरेखीत विसर्जनासाठी नेलं जातय. पालिकेच्या टीमशिवाय कुणालाही समुद्रात जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबईत यंदा 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेनं परवानगी दिलीय. त्यापैकी बहुतांश मंडळं ही लहान सोसायट्या आणि वसाहतीत आहेत. ज्या मंडळांच्या मूर्ती सहा फुटांच्या आतील आणि शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक आहेत. त्या मूर्ती पारंपरिक पद्धतीनं समुद्रात विसर्जन करण्याची परंपरा आहे. परंतु, यंदा सरसकट सर्वच सहा फुटांच्या आतील गणेश मूर्ती नियमानुसार कृत्रिम तलावातच विसर्जित होत आहेत.